गहाळ वस्तु संबंधित प्रवाशांच्या ताब्यात देतांना वस्तु महामंडळाकडे जमा राहिल्या प्रित्यर्थ ठरावीक दराने आकार वसूल करण्यात येतो़ त्यानुसार वस्तुची किंमत रू़ १००/-पेक्षा कमी असेल तर प्रति दिन प्रति वस्तु १० पैसे याप्रमाणे जास्तीत जास्त रू ५/- आणि गहाळ वस्तुची किंमत रू १००/- पेक्षा अधिक असेल तर वस्तुपोटी प्रतिदिन ५० पैसे प्रमाणे कमाल रू १०/- यादराने आकार वसूल करण्यात येतो़ त्याच प्रमाणे गहाळ वस्तु मागणीकर्त्यांच्या मागणीनुसार दुस-या गावी पाठवावयाची असल्यास उपरोक्त आकाराशिवाय वाहतुकीचा दर पार्सलच्या दराने आकारण्यात येतो़.
नाशिवंत वस्तु गहाळ सामानाअंतर्गत जमा झाल्यास अशी वस्तु खराब होऊ नये या करीता २४ तासांत या वस्तु ताब्यात घेण्याकरीता संबंधित प्रवासी न आल्यास अशा वस्तुंचा लिलाव महामंडळाकडे करण्यात येतो़ लिलाव झाल्यानंतर व ७ दिवसांच्या आत संबंधित प्रवाशांने नाशिवंत माल आपलाच असल्याची मागणी करून तशी खात्री करून दिल्यास संबंधित वस्तुच्या लिलावाद्वारे महामंडळास प्राप्त झालेल्या रकमेतून मागणीकर्त्या प्रवाशांस १०% रक्कम वजावट करून देण्यात येते़.
महामंडळाकडे जमा झालेली गहाळ वस्तु सर्वसाधारणपणे एक महिना कालावधीसाठी जमा करून ठेवण्यात येते़ या एक महिन्याच्या कालावधीत जमा झालेल्या वस्तुवर कोणीही हक्क न सांगितल्यास सदर वस्तु महामंडळाकडून जाहीर लिलावाद्वारे विक्री करण्यात येते़ गहाळ वस्तु अंतर्गत महामंडळाकडे जमा झालेले सामान / माल सरकारी बंधने असलेला असेल अथवा चोरीचे सोने - चांदी इत्यादी प्रकारचे असेल तर असे सामान पोलीस / अबकारी अधिकारी यांचेकडे जमा करण्यात येते़ तसेंच गहाळ वस्तुचे मुल्य रू़ १०००/- पेक्षा जास्त असेल तर असे सामान संबंधित विभागात जमा करण्यात येते़ सदर सामानाचा परतावा विभागीय कार्यालयाकडूनच करण्यात येतो़